Posts

Showing posts from June, 2018

स्पर्श

Image
पंच ज्ञानेंद्रियांपैकी एक म्हणजे त्वचा. नेत्रहीनांना जगाशी जोडणारा दुवा ...स्पर्श ...वयात येणाऱ्या मुलींना मात्र अनेकदा जगणे नकोसा करणारा अनुभव ठरतो. गॅजेट्सच्या  डोळे खिळवून ठेवणाऱ्या दुनियेत स्पर्शाची खरी अनुभूती आणि ताकद आपण विसरत चाललोय असे वाटून जाते ...... स्पर्श हवा तो गद्गदविणारा  चित्ती प्रेम ठसविणारा  या जगण्यातील दुःख यातना  शांत करून संपविणारा  स्पर्श हवा तो शीतल प्रेमळ  वृत्ती विकार थोपविणारा  खदखदते मेंदूचे दालन  रिक्त करून एकवटविणारा  स्पर्श हवा तो आश्वासक  धीर आधारही देणारा  या जगाचे न अपेक्षिलेले  नकोसे स्पर्शही पुसणारा  स्पर्श हवा तो प्रेरक  नव्या दृष्टी जागविणारा  विश्वाच्या खऱ्या सीमा  अन प्रतिमा दर्शविणारा  पौर्णिमा ढेरे 

क्षितीज

Image
देह, विचार आणि संवेदना आकार घेत असताना कल्पनांचे हिंदोळे, भावनांची वादळेही निर्माण होतात. आपले ध्येय, उद्दिष्टे, मार्ग चोखाळताना क्षितीजाला गवसणी घालणारे आशाळभूत मन साकार न झालेल्या भविष्यामुळे आशंकित, संभ्रमित असते. Sky is the limit अनुभवण्याचा हा सुरेख काळ सर्वांच्याच मनात अविरत रुंजी घालत असतो ! क्षितीज माझे अंधारलेले  ढगांच्या लाटांनी फेसाळलेले  उषेच्या किरणासाठी, हवेच्या झुळकेसाठी,  मातीच्या गंधासाठी आसुसलेले   क्षितीज माझे थबकलेले  कडकडत्या वीजांनी थरारलेले  टपोऱ्या गारांनी, मोहोरल्या थेंबांनी, वळवाच्या सरींनी भांबावलेले  क्षितीज  माझे गंधाळलेले  नव्या पालव्यांनी शृंगारलेले  वरून विरक्त तरीही आसक्त  अकल्पिताच्या शंकेनेच आरक्त  क्षितीज माझे मलाच कळेना  डोळ्यांच्या किनाऱ्यात मावेना  तर कधी होऊन शुष्क  मिटले ओठ उलगडेना ! पौ र्णिमा ढेरे

आकाश

Image
ईश्वराचा अमूर्ततेतील साक्षात्कार म्हणजे आकाश ! मनातील जाणिवा, अपेक्षा, आकांक्षा, निर्गुण निराकार असलेल्या वयापासून आकाश मनाला साद घालते, खचित अस्तित्वही व्यापून टाकते.  घाटातली वाट या कवितेतली ही  निळी परडी  मला मात्र आश्वासक आधार वाटते!  प्रत्येकाला एक आकाश हवं  फुलून रोमांचित होण्यासाठी  या जगण्यातील रंग अन  रंग  त्या क्षितिजावर शोधण्यासाठी  प्रत्येकाला एक आकाश हवं   भान हरपून निरखण्यासाठी  त्या कर्त्याची अजोड करणी  स्तिमित होऊन बघण्यासाठी  प्रत्येकाला एक आकाश हवं  उंच भरारी मारण्यासाठी  पिसाटणारा सुसाट वारा  धुंदीत झेलत फिरण्यासाठी  प्रत्येकाला एक आकाश हवं  हळूच पापणी मिटण्यासाठी  या विश्वाची अथांगताही  कुंद मनाला सांगण्यासाठी  पौर्णिमा ढेरे 

अव्यक्त!

Image
जे उरात उरते अशी काहीशी शाळेतील कवितेची ओळ आठवते . शब्दातून बाहेर पडूनही उरात उरणाऱ्या भावना हेच  कवितेचे जन्मस्थान असे कवीला सांगायचे होते. असंख्य शब्दांच्या अशक्य कल्लोळांती दडून राहिलेले अव्यक्त हेच खरेतर पुढील वाटचालीचे पाठबळ आहे! अश्या अनेक अव्यक्तांच्या  व्यक्त स्वरूपास सामोरे गेल्याने ही  कुपी सार्वजनिक करावी असे वाटले. उलगडण्याचा ज्याच्यात्याच्या निराळ्या पद्धती असल्या तरी मनात दडलेल्या  भावनांचे रुजलेले बीज सारखेच भासले. निसर्गदत्त विविधतेने नटलेल्या दुनियेतील प्रतिध्वनी शोधण्यासाठी हा सारा खटाटोप. भावला तर जरूर कळवा..... पौर्णिमा ढेरे