आकाश

ईश्वराचा अमूर्ततेतील साक्षात्कार म्हणजे आकाश !

मनातील जाणिवा, अपेक्षा, आकांक्षा, निर्गुण निराकार असलेल्या वयापासून आकाश मनाला साद घालते, खचित अस्तित्वही व्यापून टाकते. 

घाटातली वाट या कवितेतली ही  निळी परडी  मला मात्र आश्वासक आधार वाटते! 



प्रत्येकाला एक आकाश हवं 
फुलून रोमांचित होण्यासाठी 
या जगण्यातील रंग अन  रंग 
त्या क्षितिजावर शोधण्यासाठी 

प्रत्येकाला एक आकाश हवं  
भान हरपून निरखण्यासाठी 
त्या कर्त्याची अजोड करणी 
स्तिमित होऊन बघण्यासाठी 

प्रत्येकाला एक आकाश हवं 
उंच भरारी मारण्यासाठी 
पिसाटणारा सुसाट वारा 
धुंदीत झेलत फिरण्यासाठी 

प्रत्येकाला एक आकाश हवं 
हळूच पापणी मिटण्यासाठी 
या विश्वाची अथांगताही 
कुंद मनाला सांगण्यासाठी 


पौर्णिमा ढेरे 

Comments