क्षितीज

देह, विचार आणि संवेदना आकार घेत असताना कल्पनांचे हिंदोळे, भावनांची वादळेही निर्माण होतात.

आपले ध्येय, उद्दिष्टे, मार्ग चोखाळताना क्षितीजाला गवसणी घालणारे आशाळभूत मन साकार न झालेल्या भविष्यामुळे आशंकित, संभ्रमित असते.

Sky is the limit अनुभवण्याचा हा सुरेख काळ सर्वांच्याच मनात अविरत रुंजी घालत असतो !


क्षितीज माझे अंधारलेले 
ढगांच्या लाटांनी फेसाळलेले 
उषेच्या किरणासाठी, हवेच्या झुळकेसाठी, 
मातीच्या गंधासाठी आसुसलेले  

क्षितीज माझे थबकलेले 
कडकडत्या वीजांनी थरारलेले 
टपोऱ्या गारांनी, मोहोरल्या थेंबांनी,
वळवाच्या सरींनी भांबावलेले 

क्षितीज  माझे गंधाळलेले 
नव्या पालव्यांनी शृंगारलेले 
वरून विरक्त तरीही आसक्त 
अकल्पिताच्या शंकेनेच आरक्त 

क्षितीज माझे मलाच कळेना 
डोळ्यांच्या किनाऱ्यात मावेना 
तर कधी होऊन शुष्क 
मिटले ओठ उलगडेना !

पौर्णिमा ढेरे


Comments

Popular posts from this blog

Perfectly imperfect?

मेकिंग मोमेंट्स मॅजिकल

Crowded Solitude