मेकिंग मोमेंट्स मॅजिकल
व्हॉट इज मॅजिक? हू इज मॅजिशियन?
जादू ही एक हातचलाखी आहे, हे आता लहान मुलांपासून सगळ्यांना माहित आहे. पोतडीतून चित्रविचित्र, रंगीबेरंगी वस्तू, कधी जिवंत प्राणी बाहेर काढणारे जादूगार तर आता लहान मुलेच बनू लागली आहेत. पण जादू आणि जादूगार याबद्दलची क्रेझ काही कमी होत नाही.
का बरं? जादू हा एक कम्प्लीट ड्रामा आहे, नाही का? जादुई पोतडीतून आता काय निघेल ही उत्कंठा टिकवण्याची कला, त्या एकाच act( कृती)भोवती खिळवून ठेवण्याची हातचलाखी आणि अपेक्षेपेक्षा वेगळीच गोष्ट बाहेर काढून चेहऱ्यावरील मिरॅक्युलस (विस्मयकारक) हावभावाने माणसाला आश्चर्यचकित करण्याची अदा!
हो पण आश्चर्यचकित करणे म्हणजे मानसिक धक्का देणे नाही हो. बरेच जण सरप्राईज देण्याच्या नादात समोरच्या व्यक्तीच्या भावना, मानसिकता यांचा विचार करीत नाहीत. त्यामुळे ते सरप्राईज स्वीकारताना माणसाची मानसिक दमछाक होते. किंवा कित्येकदा त्या धक्क्यातून ती व्यक्ती बाहेरच येऊ शकत नाही.
सरप्राईज मिळालेला क्षण हा मॅजिकल असणे अपेक्षित असते. जादुई क्षण ज्याचे विस्मरण आयुष्यात कधीच होऊ शकत नाही. An unforgettable memory. And the sum of all such magical moments is your life isn't it?..... and the person who makes you feel those moments is a magician!
खरोखरच Life Is Magic. अगदी वेगवेगळ्या दृष्टीने बघाल तरी तेच आहे. पृथ्वीवर साकारलेले पहिले जीवन हे अजूनही शास्त्रीय दृष्ट्या मिस्टरीच आहे. या मिस्टेरियस जगण्याची गुढता आनंदाने अनुभवता यावी म्हणून काहीजण वेगवेगळ्या 'थेअरीज'( संकल्पना) अवलंबण्याचा प्रयत्न करतात. जसे 'कॅचिंग जोक ऑफ द मोमेंट'. या थेअरीचे अनुसरणकर्ते जगण्यातील विरोधाभास आणि त्या विरोधाभासाने निर्माण झालेला विनोद यावर विश्वास ठेवतात.
एकदा लोकल पकडता पकडता अचानकच प्लॅटफॉर्मवर मध्येच आलेल्या पसाभर गाईच्या शेणाला ओलांडून जाता जाता माझी लोकल निघून गेली. आणि मी शेणाला, गाईला बोल लावत होते. पण जवळच उभ्या असलेल्या माझ्या भावाने शेणाचा मोठा ढीग बघून मला म्हणलं, "कशाला ओलांडत बसलीस? शेणावरून घसरली असतीस तर आत्तापर्यंत पुढच्या स्टेशनला पोहोचून लोकल पकडताही आली असती."
जोक्स अपार्ट, बरेच जण आयुष्यात येणाऱ्या अडथळ्यांना संधी समजून वेगळ्या पद्धतीने पुढे जाण्याचे मार्ग शोधून काढतात. जसे एडिसनचे प्रसिद्ध वाक्य आपल्याला माहीतच आहे. "मी दहा हजार वेळा अपयशी ठरलो नसून ज्या दहा हजार पद्धतीने वीज निर्मिती होऊ शकत नाही त्या पद्धती मी शोधून काढल्या आहेत."
पण मला मात्र आयुष्य हा प्रत्येक क्षणातील जादू, 'मॅजिक ऑफ द मोमेंट' अनुभवण्याचा उत्कंठावर्धक प्रवास वाटतो. प्रत्येक गोष्टीची जादू वेगळी वेगळी असते माणसांची, स्थळांची, प्रसंगांची, क्षणांची. पण काही गोष्टी मात्र युनिव्हर्सल जादुई असतात. जसे की दाटलेले ढग बघून पिसारा फुलवणाऱ्या मोराचे नृत्य, तप्त उन्हाने लाहि लाहि होणाऱ्या अंगावर पडणारे पावसाचे टपोरे थेंब, अचानकच आकाशात अप्सरेप्रमाणे अवतीर्ण होणारे इंद्रधनुष्य, किंवा नितांत काळोखात काजव्याने डवरुन चमचम करणारे झाड.
काही जादू फक्त प्रयत्नांतीच सदृश्य होतात. जसं थकवणाऱ्या ट्रेक नंतर डोंगराच्या कड्यावरून सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने घडविलेले सचैल वायुस्नान. किंवा पाणी आपल्याला गिळंकृत करणार नाही ना, या भीतीवर समर्थपणे मात करून धरणाच्या स्तब्ध पाण्यावर पलंगाप्रमाणे पहुडल्यावर आकाशात स्वैर भ्रमण करणाऱ्या बगळ्यांचा माग काढत बसण्यातील निवांतपणा.
खरंतर एकटे असलो की आपण स्वतःच किती मॅजिकल आहोत हे आपल्याला उलगडत जाते.स्वतःत उतरत उतरत जात मनाचा तळ गाठला की वेगळ्याच क्षणांच्या अनुभवांची दुनिया सामोरी येऊ लागते. आधी अनुभवलेल्या त्याच प्रसंगातून एक वेगळीच कहाणी सदृश्य होत जाते.
मुद्राभिनयाने परिपूर्ण असलेल्या एका कथक सादरीकरणात मग्न होत असताना माझ्या मनात विचार आला, दिवसेंदिवस भावना बोथट होऊन चालता फिरता रोबो बनलेल्या माणसाला या सादरीकरणातील हावभावांमधून प्रत्येक भावनांचे अक्षरशः वेगवेगळे अर्थ शिकायला मिळत आहेत. ज्या जगात माणसं हळूहळू भावनांपासून दूर जात आहेत, भावनांवर नियंत्रण ठेवण्याला गौरवांकित केले जात आहे , त्या जगात या नृत्याने सहजपणे सांगितले आहे की, संवेदनशील आणि भावनांनी भरलेला "माणूस" असणं किती सुंदर आहे.
परवा आम्ही लाईव्ह म्युझिक असलेल्या रेस्टॉरंट मध्ये जेवायला गेलो. शाळेपासूनच्या आणि कधीतरी भेटण्याचा योग मिळालेल्या मैत्रिणींना खरं तर स्थळ, काळ यांचं भान किंवा अप्रूपही राहत नाही. पण चेकिंग,टेस्टिंग चे रुटीन फॉलो करून गायकाने अरिजीतच्या गाण्याचा पकडलेला सूर आणि आवाजातील आर्तता उपस्थित सगळ्यांना या जगापासून कधी दूर घेऊन गेली काही कळालच नाही. पूर्ण अनुभव खरोखरच जादुई होता. इतका की गायकाने गाणं थांबवल्यावर सगळ्या श्रोत्रूवर्गाने एकत्रितपणे त्याला 'अभी ना जाओ छोडकर के दिल अभी भरा नही' अशा अर्थाची दोन-तीन गाणी पूर्ण पूर्ण म्हणून थांबवण्याचा एक अनोखा अनुभव दिला. तो त्या गायकासाठीपण नक्कीच तेवढाच जादुई होता.
पसरते की नाही जादू एका आयुष्यातून दुसऱ्या आयुष्यात? आपण बरेचदा आपल्याच आयुष्यात गैरहजर असतो कुठल्यातरी चिंता, विचार, अडचणी, प्रसंग, अनुभव आपल्याला त्या मोमेंट पासून किंवा वर्तमानापासून दूर नेत असतात त्या क्षणांची, जवळ असलेल्या व्यक्तीची, प्रसंगाची महती सोडाच पण अस्तित्वदेखील आपण समजू शकलेलो नसतो. पण ज्या माणसाला तुमच्या मनाची त्यावेळची अवस्था समजूनही तुम्हाला अलगद अनुभवांच्या वेगळ्या दुनियेत घेऊन जाता येते ना तो माणूस तुमच्या आयुष्यातील जादूगारच असतो. काय सांगताय? कोणते गाणे आठवले तुम्हाला?
'मैं कोई ऐसा गीत गाऊ' मध्ये जुहीला रमवण्याचा प्रयत्न करणारा शाहरुख अशाच जादू निर्मितीच्या प्रयत्नात नव्हता का? आपल्या आवडत्या माणसासाठी मॅजिकल मोमेंट्स बनवण्याचा हातखंडा आपल्याकडे असला पाहिजे बरं! हा प्रयत्न म्हणजेच 'Making moments magical' can actually turn our entire life into a magic and we will be magicians of our own life isn't it?
Pournima Dhere

Great
ReplyDeleteMagician of words