तिच्या आयुष्यातील तो




सगळ्यांना झेपत नाही

स्वतंत्र विचारांची

निर्णयक्षम बाई!


खांद्याचा आधार घेणारी

घाबरून कुशीत शिरणारी

प्रश्नांवर वेडी ठरवता येणारी बाई

सुखावते अहम आपला! 


तिला आधाराचा भास देऊन

विचार मर्यादांच्या

पिंजऱ्यात डांबण्यातच

सार्थकी लागतं आपलं जीवन


असतो पण तिच्या आयुष्यात,

तिच्या जिद्द आणि स्वाभिमानासाठी

आपल्या आकांक्षांना तिलांजली देणारा

माणूसही!


तिने चितारलेल्या

हर एक काड्याकुड्यातून

तिच्या मनाचा तळ शोधणारा

गोताखोर पण!


किंवा असूही शकतो

तिच्या विचारांच्या

भिरभिरणाऱ्या फुलपाखरांसोबत

घुटमळणारा भुंगा!


तिच्या झाकोळलेल्या आत्मशोधात

भटकणारा वाटसरू

किंवा या भरकटलेल्या नावेला

दिशा देणारा दीपस्तंभदेखील!


तिच्या हुंकारांना

साक्षी असणारा तिचा मित्र

आणि तिला निरुत्तर करणाऱ्या कूटप्रश्नातही

तिला हसत ठेवणारा तिचा जिवलग!


तिच्या आत्माविष्काराचा

मूक साक्षीदार असलेला सहप्रवासी

किंवा तिला तिच्याच अस्तित्वाची

जाणीव करून देणारा अवलिया सुद्धा!


पण तिच्या हट्टासाठी, तृषार्त स्वप्नांसाठी

तिच्या स्वतःसाठी, तिला परत परत सोडून देणारा

एकच असतो


आणि तीही आयुष्याच्या प्रत्येक वळणावर

जास्तीत जास्त खंबीरपणे परत परत निवडत राहते

फक्त त्यालाच!


Pournima Dhere 



Comments

  1. Amazing

    खूपच सुंदर आणि प्रभावी लेखन! 💫
    स्वतंत्र, विचारशील आणि आत्मभान असलेल्या स्त्रीचं इतकं सूक्ष्म, संवेदनशील आणि प्रगल्भ चित्रण शब्दांत गुंफणं — खरंच अद्भुत आहे. प्रत्येक ओळ विचार करायला लावणारी, आणि प्रत्येक भाव मनात रेंगाळणारा! 🙏✨
    तुमच्या लेखनात ताकद, कोमलता आणि अंतर्मनाचा साक्षेप — तिन्हींचा अप्रतिम संगम आहे. 🌸

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मेकिंग मोमेंट्स मॅजिकल

Perfectly imperfect?

दृष्टिकोन