आषाढ पाऊस


पाऊस हा एक शब्द उच्चारल्यावर तुमच्या मनात नक्की कोणते संदर्भ दाटून येतात? 


सध्या मला पाऊस सुरू झाला की पावसाळी कविता, काव्य मैफिली,  त्यातही श्रावणी काव्य स्पर्धा आणि त्यावर कडी म्हणजे आषाढ कवितांची आमंत्रणे डोळ्यासमोर आली. श्रावणी कवींवर टीका-टिप्पणी करणाऱ्या पोस्ट, त्यांच्यावरच्या कोट्या फिरवणारे संदेश या विचारांमुळे लहानपणीचे नव्या पुस्तक- वह्यांचा वास, रेनकोट घालून डबक्यात उड्या मारणारी मुले,भजी आणि कॉफीसाठी आर्जवे करणारे नवरे, पहिल्या पावसाबरोबर गौरी गणपती आणि सणवार सवाष्णींची  चिंता करणाऱ्या सासवा, विरहमग्न दाम्पत्ये, मातीचा सुवास हे सगळे संदर्भ पार पुसून गेले.


पाश्चात्त्य कालमापन आणि संस्कृती स्वागतपूर्ण अंगिकारल्याने सध्या महिने,ऋतू यांचे संदर्भ अडगळीत गेले आहेत. आषाढ कविता! आता आषाढ म्हणजे कुठला इंग्रजी महिना? परत पावसाळ्यात याचा कुठला नंबर? नक्की पावसाळी ऋतू कुठले? हा पहिला तळागाळात गेलेला संदर्भ या विषयाने मला आठवून दिला. 


श्रावणी पाऊस शाळेपासूनच मनात बिंबलेला होता. बालकवींच्या


 'श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे

क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी उन पडे'


या कवितेतला पाऊस तर हवाहवासा आहे, प्रसन्न आहे. पण आपल्याला काही दिवसांपूर्वी जाणवणारा पाऊस तर


गरज गरज आज मेघ घनन घनन छायो रे

दमक दमक चमके बिजुरी कहत है ऋतुराज आयोरी 


या मेघमल्हार प्रमाणेच धीरगंभीर मन आणि आठवणींत खोल खोल घुसत जाणारा आहे.



ग्रीष्माची लाही, त्यानंतर वाढत जाणारा दमटपणा हवेतील आणि मनातील घुसमट वाढवत जातो. वळवाच्या सरींनी, कडकडणाऱ्या विजांसकट त्यावर फुंकर घातली तर क्षणिक का वीना तगमग थांबते. पण सध्या जून महिना संपेपर्यंत आपल्याला हुलकावणी द्यायची हे पावसाचे ब्रीदच आहे. 


जून महिन्याचा संदर्भ लागताच आषाढी पावसाच्या वैशिष्ट्यांची ओळख मनोमन पटली.


विदाईच्या वेळेस शांत राहून सासरचे माप ओलांडलेली नववधू, मधुचंद्राच्या एकांतात पहिल्यांदा अंगावर लपेटलेला खंबीरपणाचा बुरखा टराटरा फाडून आपल्या दाटलेल्या भावना मोकळया करत कोसळते आणि ते बघून नव्या नवऱ्याचीही कशी गाळण उडते; तसा आषाढ पाऊस आपल्या संततधारेने मनावरचा मळभ, हृदयातील कढ पुन्हा पुन्हा दूर करण्याचा निष्फळ प्रयत्न केल्यासारखा; कितीही बरसला तरी रिता न होणारा आणि वर्षभराच्या विरहानंतर अचानक अवतीर्ण होणार्‍या या पर्जन्यवृष्टीमुळे आपणही भांबावलेले असतो. त्यानंतर पूर,ट्रॅफिक जॅम, तुंबलेली गटारे, बुडलेल्या वस्त्या आणि सरकारवरचे ताशेरे सर्वत्र गजबजू लागतात.


पावसाच्या ओढीने नादावलेले मन आता मात्र खिडक्या- दारे गच्च बंद करून घरातच निपचित पडून राहते. नाही नाही, आपलं वाढलेलं वय याला कारणीभूत आहे असं वाटत असेल तर 'गारवा' ऐका. त्यात एकतर पावसा पूर्वीचा नाहीतर पावसानंतरच्या गारव्याचा गोडवा गायला आहे.


हिरवा शालू ल्यालेली सुंदर धरा, ती पाहून मोहणारे पक्षी हे सगळं नंतर हो!  जेव्हा हे कडकडते नाट्य संपेल, ढगामागून सूर्य हळूच पाहिल तेव्हा. जेव्हा ऋतुराज वर्षा येईल तेव्हा.या राजाच्या आगमनाचे ढोल ताशे घेऊन येतो तो आषाढ पाऊस! कडाडत्या विजा, त्यांची  मनाचा थरकाप उडवणारी आभाळभर रोषणाई; संपूर्ण पृथ्वीला संपन्न बनवणाऱ्या राजाला हा रुबाब तर शोभतोच! त्यानंतरची हिरवळ,पाण्याची खळखळ हीच या राजाची श्रीमंती, संपन्नता, सुबत्ता यांचे प्रदर्शन भरवणारी मिरवणूक आणि त्यावरील फ्लैश लाईट म्हणजे श्रावणातील सूर्यदर्शन!


महिन्या-महिन्यातील पावसातला हा फरक या आधी कधीच जाणवला नव्हता किंवा या पावसाला महिन्यांचा, ऋतूंचा संदर्भ लावून कधी जोखला नव्हता. हिवाळा, उन्हाळा पुन्हा पावसाळा इतक्या मोघम वर्गवारीतील या ऋतुंचे खरे स्वरूप विशद होत नाही हेच खरे.


पौर्णिमा ढेरे.

Comments

  1. भावनांचा, विचारांचा चांगला मागोवा घेतला आहे. नव्या नवरा - नवरीची उपमा आवडली. आषाढ पावसाचे स्वागत वाजत- गाजत होते. तेच त्याचे वैशिष्ट !

    ReplyDelete
  2. Great
    brilliant

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मेकिंग मोमेंट्स मॅजिकल

Perfectly imperfect?

दृष्टिकोन