Idol

 


आपला  आवडता खेळाडू जेव्हा रिटायर्ड होतो, आपल्या मनाला चटका बसतो!

खेळाडू आपले idol, आपले निरागस  क्रश असतात. लहानपणी,  मोठे होऊन त्यांच्याप्रमाणे खेळणे, वागणे, बोलणे  हे आपले  स्वप्न असते. तो/ ती  चुकला/ली की, "अरे! मी   खेळेन तेव्हा असे खेळेन!"; असे प्लान्स आपण बनवतो. हळूहळू त्यांच्या खेळाबरोबर आपणही मोठे होतो.

आता  खेळाडू आपल्या वयाचे असतात. पेपर मधील आर्मी, नेव्ही सिलेक्शनच्या जाहिराती आपल्याला खुणावत असतात. जग मुठीत आहे! बस, मी हात पुढे करण्याचा अवकाश! अशा तोऱ्यात आपण मिरवत असतो.

हा काळ देखील सरतो. हळूहळू नेव्ही, एअरफॉर्स सिलेक्शनच्या  जाहिरातींपुढे आपली वये निघून जातात. आपल्या त्या आवडत्या खेळाडूला  त्याचा फॉर्म मिळत नसतो. त्याच्या निवृत्तीबाबत वावड्या उठत असतात. त्याच्या फिटनेस वर चर्चा होऊ लागते. का कुणास ठाऊक, आपल्या  वर्मी लागते.  नकळत आपणच आरसा बघू लागतो. जसा  तो खेळाडू  फॉर्मबद्दल  अन फिटनेसबद्दलच्या  वावड्या धुत्कारतो, तसं आपणही मिशांना पीळ देतो, पोट आत घेत छाताड रूंदावत राहतो. केसांच्या  झूलपांनी  डोक्यावरचे विमानतळ  झाकतो. 

अशातच कधीतरी  मैदानावर दमलेल्या आपल्या Heart throb चे   छायाचित्र आपल्यासमोर येते. त्याच्या टीम मॅनेजमेंटचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून आपण आपली कामाची सूत्रे चालवलेली असतात. एखाद्या पराभवानंतर त्याने उंचावलेली कामगिरी पाहून आपले मनही उचल खाते. अनिर्णित विषयांचा आपण लीलया फडशा पाडतो.

आणि एक दिवस त्याच्या निवृत्तीची बातमी आपल्या कानावर येऊन धडकते. मग मात्र आपण मनातून ढासळतो. आपल्या चिरतारुण्याच्या  कल्पनांच्या उत्तुंग बुरुजांना खिंडारे पडू लागल्याचे आपल्याला जाणवते. शांत निशब्द होऊन आपण आपल्यालाच analyse करू बघतो. त्याच्या खेळाच्या सुरुवातीपासूनच्या  वृत्तांताबरोबर  आपलाही जीवनपट उलगडून बघतो.

पुन्हा खेळ चालू होतो  आणि आपले समालोचनही!  "छ्या!  हा ना! हा शॉट याला काही जमला नाही. त्यासाठी तोच हवा!आजकालच्या मुलांना अनुभव नाही. उगाच साहस करायला जातात आणि बळी पडतात."  खरे आहे ना?


पौर्णिमा ढेरे 


Comments

Popular posts from this blog

मेकिंग मोमेंट्स मॅजिकल

Perfectly imperfect?

दृष्टिकोन