उंबरा

 


उभा आहेस कित्येक वर्ष 

पावसाचे क्वचित उद्भवणारे  लोट अडवत अन 

धुळीच्या छोट्या मोठ्या वादळात 

पानांची  शिरकावणारी वाट अडवत 


माझी रांगणारी अजाण धाव तू अडविलीस तेव्हा  

आईला केवढा दिलासा मिळाला होता


तेव्हापासूनच निर्धास्त होते सगळे 

मला तुझ्या अस्तित्वाच्या मर्यादेत बांधून 

माझ्या प्रत्येक हुंकाराला  तुझ्या आडोष्याचे बंधन घालत 


तुझ्यावरचं माप ओलांडल्यावर तर त्यावर सोन्याचा मुलामा चढला

अन् मीही नव्या बांधणीच्या घरात 

जेमतेम उरलेल्या तुझ्या अस्तित्वाला 

अधोरेखित करत गेले रांगोळीच्या पट्ट्यांनी


पण तू काही छप्पर नाहीस कोसळणाऱ्या धारा अडविणारे

किव्वा भक्कम भिंतही नाहीस सोसाट्याच्या वारा थोपविणारी


मी धुडकावले  तुझे  अस्तित्व 

माझ्याभोवती लक्ष्मणरेषा खेचल्याची आव आणणारे 

माझ्याच  रुंदावणाऱ्या पंखांना छाटू बघणारे


पण ओलांडून तुला बाहेर पडणे हा तर फक्त पहिला टप्पा होता

प्रत्येक वळणावर माझ्यासाठी नवा उंबरा हजर होता 


अन् लढता लढता अचानक समजलं हा लढा तर निरर्थक होता. 

तुझे माझ्या आयुष्यातील असणे हा एक प्रतीकात्मक आविष्कार होता.


नव्हतेच कधी तुझे संदर्भ माझ्या पोहोचेच्या दिशा ठरवण्यासाठी.

कारण कोणालाच नसतो हक्क दुसऱ्याच्या सीमा रेखण्याचा


तू  फक्त उभा होतास कित्येक वर्ष 

पावसाचे क्वचित उद्भवणारे  लोट अडवत अन 

धुळीच्या छोट्या मोठ्या वादळात 

पानांची  शिरकावणारी वाट अडवत


हेच सांगायला की 

पाटातल्या चुकार पाण्याच्या लोंढ्यासाठी धरणाच्या भिंतीची गरज नसते 

मातीच्या छोट्याश्या बांधानेच थोपविले जातात अनावश्यक प्रवाह 

मातीचा कस जपण्यासाठी, 

अंन डोलणाऱ्या पिकासाठी गरज नसते दगडी भिंतीची

साध्याशा बुजगावण्यानेही थबकते घिरटी पक्ष्यांची.


बस फक्त उठून उभ राहायचं स्वतःसाठी 

पावसाचे क्वचित उद्भवणारे  लोट अडवत अन 

धुळीच्या छोट्या मोठ्या वादळात 

पानांची  शिरकावणारी वाट अडवत

उंबऱ्यासारखं  सतत सावध!


पौर्णिमा ढेरे 

Comments

  1. Very very excellent and touching and explains concept about boundaries in a very new manner 👌👌

    ReplyDelete
  2. छान जाणीव ! मोठे झाल्यावर आणि उंबरठा ओलांडल्यावर कळते की तो आपल्याच मनातील आपल्याला सावरणारा एक आधार असतो !!

    ReplyDelete
  3. खूपच सुंदर...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मेकिंग मोमेंट्स मॅजिकल

Perfectly imperfect?

दृष्टिकोन