शोध - २
काळाच्या खोल डोहात,
आठवणींच्या अथांग गर्तेत,
जखमांच्या धडकणाऱ्या लाटांत,
भग्न स्वप्नांच्या काळोखणाऱ्या आसमंतात
शोधात होते तुलाच चाचपडत धडपडत !१!
भास आभासांच्या फसव्या जगात,
क्षणभंगुर कवडश्यांच्या मृगजळात,
जाणिवांच्या होरपळणाऱ्या वणव्यांत,
भावनांमध्ये गटांगळ्या खात,
तरंगण्याच्या फक्त अविर्भावात,
परत परत, घोकत घोकत,
हुडकत होते निरंतर सतत
गेला कुठे असा अवचित
आनंदाचा ठेवा तो शाश्वत !२!
होता मुलीच्या निर्मळ हास्यात
अन कोकिळेच्या मंजुळ स्वरांत
ध्येयवेड्या जिद्दी मनामनांत
सळसळणाऱ्या पानापानांत
पण नसे तो माझ्या अंतर्मनात !३!
खिजवी मला लपंडावात
रांगोळीच्या अगणित रंगांत
मेहेन्दीच्या रेषारेषांत
अलवार उलगडणाऱ्या कवितांत
पण लुप्त होई क्षणार्धात !४!
मित्रत्वाच्या साद साथीत
सांत्वनाच्या धीरगंभीर कवेत
चेतवणाऱ्या पाठबळात
अविचल स्थीर आधारात
प्रकटे प्रत्येक वळणावळणांत !५!
बकुळीच्या फुलाच्या मादक गंधात
अन गुलबक्षीच्या मोहक रंगात
विस्तीर्ण आकाशाच्या अंतरंगात
घुंगरांच्या अल्लड आवाजात
वळवाच्या पावसात भिजवी नखशिखांत !६!
सात्विक नवरसयुक्त आहारात
पाथरवटांच्या घर्मबिंदूंत अन हस्तरेषांवरील घट्याघट्यांत
सातत्यात, सेवाभावात, ठाव घेणाऱ्या ममत्वात
भजनांतील आर्त आर्जवे अन रुंजी घालणाऱ्या दत्तपदांत
गाभाऱ्यात तेवणाऱ्या नंदादीपात अन पूर्ततेच्या साक्षात्कारात !७!
कुठे शोधू कुठे लपवू ?
किती घेऊ किती ठेवू ?
पाझरणारा झरा अडवू
कसा जिरवू कसा मुरवू ?
सदचिदानंद रूपे मिरवू
चराचरांत, क्षणाक्षणांत
विचार तरंगात, प्रतिक्षिप्त क्रियांत
तनामनांत, रोमारोमांत
लुप्त होणाऱ्या स्वत्वाच्या किनाऱ्यांत !८!
पौर्णिमा ढेरे

Tuzya shabd rachana.. visheshane, upma alankaracha vapar.. kaplnanchi bharari aani vicharanchi unchi..
ReplyDeleteSarvach apratim
Sundar lihilay..
ReplyDeleteफारच छान! हाच खरा आयुष्याचा प्रवास.
ReplyDelete