गोष्ट तुझी अन माझी

 
परिपूर्णतेच्या प्रवासात तुमचा जोडीदार हा तुमचा सच्चा साथीदार असतो. संसाराच्या रोलर कोस्टरचा थरार  तुम्ही सोबत अनुभवता. एकत्रच हेलपांडता, उल्हसित होता. एक डगमगला दुसरा सावरतो. अशानेच तर संसार अर्थपूर्ण होतो. अशी ही  या राजाराणीची गोष्ट, बघा आवडतेय का?
 
 
 
गोष्ट तुझी अन माझी 
नव्हती कधीच दोघांची 
प्रारंभातच घातली 
सांगड ती प्रत्येकाशी !१!
 
राजाराणीचा संसार 
मिळे बिरुद साभार 
दिला घरकुला आकार 
करून सर्वांचा विचार !२!
 
काड्या काड्या जमवून 
छोटे घरटे बांधावे 
टुमदार हवेल्यांची 
आस नच मनी शिवे !३!
 
बदलत्या ह्या ढंगात 
नच रंगलो नवरंगात 
पसरलीही ओसरी 
ओळखूनच पायरी !४!
 
फक्त होती अपेक्षाही 
घ्यावे सर्वांनी समजून 
नको नको हारतुरे 
घ्यावे फक्त सामावून !५!
 
मिळो सावली अशीही 
घनदाट त्या वडाची 
बळ मिळे जिच्याठायी 
उंच घ्याया भरारी ती !६!
 
समजून घेता घेता 
हा सर्व भोवताल 
आपुल्यातच तो चुके 
शब्द, सूर अन ताल !७!
 
प्रत्येकाला देता देता 
'स्पेस ' हवी ती जरूर 
उरे रिक्त पोकळी ती 
उलटता कालांतर !८!
 
भीक मागता प्रेमाची 
होती कास संवादाची 
शर्थ व्यर्थ ती यत्नांची 
नको तृष्णा मृगजळाची !९!
 
नको पुन्हा मन म्हणे 
चकव्यात जाणे येणे 
पंथ आपला धरोनी 
करू पूर्ण मार्गक्रमणे !१०!
 
वारे कानात भरोनी 
नको उधळाया वारू 
ठरवूनी नवी दिशा 
शीड पुन्हा उभी करू !११!
 
गुंफू सुरांचे संकुल 
जोत्यावर उमेदीच्या 
होऊ स्तंभ घेऊ भार 
नव्या साथीने तानांच्या !१२!
 
व्हावा शेवटहा गोड 
अशा दौडे मनोन्मनी 
दे खंबीरही साथ
निरंतर पदोपदी !१३!
  
अर्ध्यावर उरलेली 
करू पूर्ण हि कविता 
करू दोघांच्या गतीने 
प्रवासाची या सांगता !१४!
 
पौर्णिमा ढेरे 
 

 
 
 
 

Comments

Post a Comment