सहज
किती सुंदर आहे हा शब्द ...सहज ! उगाच म्हणून मित्राला मारलेली हाक, कामाशिवायची रपेट, किव्वा वेळ आहे म्हणून केलेली खरेदी, जास्त सुखावून जातात नाही का?
एरवी हा जीवनरगाडा असा नेहमीच कार्यकारणभाव ओळखून चाललेला असतो. आजच्या कॉर्पोरेट जगात, दैनंदिन व्यवहारात संभाषणदेखील मोकळेपणाचे नसते. त्यामागेदेखील काहीतरी उददेश असतो. त्यामुळे बसस्टॉपवरील अनोळखी व्यक्तीबरोबर बेस्टवर टाकलेला विनोद किव्वा मुलांबद्दल व्यक्त केलेली काळजी व्यक्तीला हात उंचावून टाटा करण्याइतकी जवळीक निर्माण करून जातात.
यातून social media वर लोकांचं रमणं साहजिक असल्याचं अधोरेखित होतं. कित्येकदा आपली दुःख सोडाचं आपल्या प्रगतीबद्दलही आपण कुणालाच बोलू शकत नाही. मग तीच बाब tweet करून अथवा पोस्ट share करून त्यावरील thumbs काउन्ट करून आपण आपल्या पाठीवर पडलेल्या कौतुकाची थाप अनुभवतो.
आपल्याबाबत थोडकीसुद्धा माहिती नसताना योग्य वेळी वाचनात आलेल्या inspirational thought चा sender philosopher किव्वा guide बनून जातो.
आयुष्य हवेवर उडणाऱ्या शेवरीच्या कापसासारखं हलकं असावं. मग असा अनुभव देणारे आपले मित्र बनतात. सध्याच्या युगात प्रत्येक गोष्टीसाठी होणारी जीवापलीकडची स्पर्धा मोठ्यांच्याच काय लहानांच्या आयुष्यातलीही सहजता नष्ट करून टाकतात. निकोप निरागस बालपण जपणं खरोखरीच कठीण झाले आहे.
दमल्याभागल्या जीवाला दरवाजातच मिळालेला आपुलकीच्या हास्याचा प्रसाद किव्वा घाईघाईत घराबाहेर पडताना छोटुकल्याने हात ओढून गालावर दिलेला पापा सर्व ताण शिथिल करून टाकतात.
निसर्गात का रमतो माणूस? त्या झऱ्याचे कड्यांवरून अल्लड फेसाळत खळाळणे कशासाठी असते ? जगातील सर्वात मोठी नदी बनण्यासाठी? की पहिल्या क्रमांकाने धावत समुद्र गाठण्यासाठी? वाऱ्यावर सळसळणारी पाने सारेगामाच्या championship साठी गात नसतात! मोहवणारा रातराणीचा सुगंध कोणत्याही अपेक्षापूर्तीसाठी नादावत नसतो! पायाशी रुंजी घालणाऱ्या लाटा तुमची खुशमस्करी करत नसतात! निसर्गाने केवढी सहज आणि सुंदर अशी हि देणगी निर्माण केली आहे!
आयुष्यातील वाळवंटात असे अनेक ओऍसिस आहेत. मानले तर मृगजळ, अन रमलो तर अंतर्बाह्य बदल घडविणारी प्रेरणास्थळे!
प्रत्येक दिवसाचा मळभ असाच सहजगत्या काढून, विरणारे माणूसपण टिकवू या, चला आपणही थोडे 'सहज' होऊया !
पौर्णिमा ढेरे

Very true now a days we express ourselves very artificially sahaj we are missing
ReplyDeleteआयुष्य हवेवर उडणाऱ्या शेवरीच्या कापसासारखे असावे..हलके..सहज...सुंदर.
ReplyDelete