मन

 
कधी कधी समुद्राकाठी उभे राहिल्यावर समजते कि खळबळ फक्त पहातच नाही तर अनुभवतही आहोत. लाटांच्या स्वैर धडका मनातही उलथापालथ करीत आहेत.  त्याला  बांध घालायचा प्रयत्न केला  तर उपयोग होत नाही. अशावेळेस खळबळीच्या उगमापर्यंत पोहोचून समूळ नष्ट करण्याची गरज भासते. कोणाला सापडले आहे का हो मनाचे मूळ ?
 


मन  मनास उमगत नाही
आधार कसा शोधावा
स्वप्नातील पदर धुक्याचा
हातास कसा लागावा

श्री. सुधीर मोघे यांच्या या गाण्यात मन या संज्ञेच्या परस्परविरोधी भूमिका अधोरेखित करत मन या संकल्पनेच्या नाट्यमय अस्तित्वावर तसेच पैलूंवर प्रकाशझोत अगदी चपखल शब्दात टाकला आहे. प्रत्येक ओळीवर अंतर्मुख होऊन विचार केल्यास प्रत्येकाला स्वतःचा वेगळाच चेहरा बघायला मिळेल हे नक्की.
 
मनाच्या तळाचा शोध कोणाला घेता आला आहे का? मन खरंच कसं आहे हे कोणाला माहित आहे का? "सैरभैर झाला सारा वारा रानोमाळ" तसे हे मन अत्यंत चंचल अगदी बालकवींच्या श्रावणासारखं "क्षणात होते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे". लंबकासारखे दोलायमान, झोक्यासारखे हिंदोळे, कोलूच्या बैलासारखे चकरा मारणे किंवा  चक्रीवादळासारखे घोंघावणे सर्वच याच्या लीला. तसेच पांगळ्यालाही पर्वत ओलांडता येईल, समुद्रपक्ष्यालाही अवकाशभरारी मारता येईल एवढे त्याचं सामर्थ्य. त्यामुळे आपल्याच नाही तर आजूबाजूच्या सर्वच आयुष्याची उलथापालथ करण्याची प्रचंड ताकद या निर्गुण निराकार अवलियामध्ये असते.
 
आता तुम्ही विचाराल एवढे सगळे गुण-अवगुण दाखवणारे मन निर्गुण कसे? ते यासाठी कि प्रत्यक्षात मन पाण्यासारखे पारदर्शक पण त्याचा रंग मात्र त्यात उठणाऱ्या वृत्तीसारखा.
 
'मन करा रे प्रसन्न सर्व मुक्तीचे साधन' असे म्हणत संतांनी मनाचे संयमन करण्यास सांगितले आहे. पण त्यातील वृत्ती त्याच्यापेक्षाही हट्टी. सामान्य माणसाला त्याकडे साक्षित्वाने बघणेदेखील अशक्य होते. मनातील वृत्तींच्या  प्रत्येक लाटेवर स्वार होत आपण आपला प्रवास करत असतो. त्यामुळे दर पौर्णिमा अमावस्येला भरती-ओहोटी ठरलेलीच असते.
 
त्यामुळे, "गम और ख़ुशी में फर्क न महसूस हो जहाँ, मै खुद  को उस मुकाम पे लता चला गया" हे माझे ब्रीदवाक्य अनंताच्या प्रवासासारखेच आहे. मनाचा भरवसा नाही हे खरंच आहे पण मनाच्या चकव्यात न फसणे एवढाही प्रयत्न आयुष्याच्या धडपडीचा मोठा पाया होऊ शकतो. 
 

Comments

  1. थोड्या शब्दात खूप काही सांगून जातेस..मस्त

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मेकिंग मोमेंट्स मॅजिकल

Perfectly imperfect?

दृष्टिकोन