सवय
जगण्याच्या धडपडीत आपण आपल्या सवंगड्यांपासून खूप दूर जातो. तरल मनाने जगाला सामोरे जाताना खूपसे ओरखडे पडतात. त्यावर स्थितप्रज्ञतेचे आवरण चढविण्याचा केविलवाणा प्रयत्न आपण करत राहतो. मनाची भाषा न समजणाऱ्या जगात मौनच इष्ट असे अनेकदा वाटून जाते. न कळत त्या मौनाची सवयही होऊन जाते.
सवय झाली आहे आता मला
मुक्यानेच राहायची
मनात उमटणारे उमाळे दाटून
मुक्यानेच परतायची
पाऊस सुद्धा आता मला
असाच खूप झुलवतो
बरसण्याचे आश्वासन देऊन
नुसताच गर्जत जातो
प्रत्येकाची हुलकावणी का
अशीच सहन करायची ?
सवय झाली आहे आता मला
मुक्यानेच राहायची
मुके शब्द मुकी भाषा
शब्दाविण सुन्यासुन्या
स्तब्ध उभ्या मुक्या दिशा
डोळ्यांना मात्र रोज आशा
नव्या क्षितिजाची दाखवायची
सवय झाली आहे आता मला
मुक्यानेच राहायची!
थबकला श्वास
जडावले तन
दाटलेल्या भावनांने
ओथंबले हळवे मन
पावलांनी मात्र दिशा
रोज नवी धुंडाळायची
सवय झाली आहे आता मला
मुक्यानेच राहायची
आता मात्र झुरणे
घुसमटणे नामंजूर आहे
शब्दासाठी आसुसणे
घुटमळणे अमान्य आहे
नाद स्वरांच्या दुनियेला
सोडचिट्ठीच द्यावयाची
सवय झाली आहे आता मला
मुक्यानेच राहायची!
पौर्णिमा ढेरे

Comments
Post a Comment