तू

नव्यानेच जीवनाची सफर सुरु करताना, येणाऱ्या  रोमांचकारी किंवा जगण्याची चौकटच उलथविणाऱ्या अनुभवांना सामोरे जाताना, सहप्रवासी भेटला की प्रवास सुखकर होतो, पल्ला वाढतो, आत्मविश्वास वृद्धिंगत होतो.

पण आयुष्याच्या या टप्प्यातील प्रवासी 'एक लाट तोडी दोघा  पुन्हा नाही गाठ' या नियमाप्रमाणे आपापल्या दिशा धरतात. अन भावविश्वात पोकळी निर्माण करून जातात  ....


तू आलीस अन.......
माझा शब्दांशी सूर जुळला 
छोटे छोटे बोल 
मला बोलायला शिकविलेस 
माझ्या मनाची बंद कळी 
हळूहळू उलगडलीस

दबलेल्या भावना समजून घेतल्यास  
अडलेल्या अश्रूंना वाट दिलीस 
उरात उठणारी कित्येक वादळे 
तू शमवलीस 

शब्दांनी दुसऱ्यांना समजावणे शिकविलेस 
शब्दांनी दुसऱ्यांना समजणे शिकविलेस 

पण आता तू गेलीस अन ...... 
माझे शब्द परत हवेत विरू लागले आहेत 
किनाऱ्यावरील लाटेसारखे तिथे तिथेच 
घुटमळू लागले आहेत 

उगाच भिंतीवर आपटून विखरून पडतात 
म्हणून शब्दांशी नातं तोडलंय !
तू गेलीस अन .... 
माझा परत ज्वालामुखी झालाय !

पौर्णिमा ढेरे 

Comments

Popular posts from this blog

मेकिंग मोमेंट्स मॅजिकल

Perfectly imperfect?

दृष्टिकोन