घाट

काही काळ मुंबईत राहिल्याने पुणे मुंबई प्रवास पाचवीला पुजल्यासारखा वाटला तरी जिथे पाचवी झाली तो लोणावळ्याच्या घाट आजही नव्या प्रेरणा व विचार देतो आणि मन उल्हसित करतो. 


'लोणावळा सोडलं ग ' असं आईला सांगून फोन बंद केला. साहजिकच मन शाळेतल्या गमती जमतीत हरवलं. गाडी हळूहळू घाट उतरू लागली अन शाळेतली कविता आठवली. 

घाटातली वाट काय  तिचा थाट 
गिरकते  मुरकते लवते पाठोपाठ 
निळी निळी परडी कुणी केली पालथी. 
पानं फुलं सांडली वरती आणि खालती 
खाली खोल दरी वर उंच कडा 
भला मोठा नाग जणु उभा काढून फणा .... 

बसमधला प्रत्येक माणुस याच निरागसतेने माना उंचावून खिडकीतून घाट बघण्याची धडपड करत होता. निसर्गाच्या त्या उदात्त देणगीला डोळ्यात दडवून नेऊ पहात होता. 

हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट  
सांगो चेडवा दिसता कसो खंडाळ्याचो घाट 
हिरव्या हिरव्या sssss 

लगेच हे गाणेही आठवले अन खंडाळ्याच्या घाटाच्या कैक वर्षांपासूनच्या प्रसिद्धीची खुणगाठ पटली. 

किशोरवयापासून घाट मला अनेक प्रश्नांची उत्तरे द्यायचा. जसे पुढे रस्ता दिसत नसला तरी धीर धरावा क्षणार्धात वळणानंतर नवी दिशा मिळू शकते. घाटात चुकीचे वळण घेतल्यास रिव्हर्स गीयर टाकणेच  इष्ट असते, इत्यादी जीवनविषयक तत्वज्ञानाचा साक्षात्कार  घाटातल्या प्रवासातच झाला होता.

आज घाट खुणावत होता  आपण खूपदा तिथे तिथे गोल गोल फिरतो, परत परत घुटमळतो, फिरून फिरून एकाच ठिकाणी येतो. घाटात वेगवेगळ्या कोनातून तेच दृश्य वेगळे वेगळे दिसते. पण उंचीवरून सगळा रस्ता आपल्यापुढे उलगडतो. 

तसेच आयुष्यात आपणही कुठल्यातरी अक्षाभोवती गोलगोल फिरत असतो. कोलूच्या बैलाप्रमाणे वागत असतो.  मनाची उंची गाठली किव्वा स्वतःला तटस्थपणे बघितले तरच खरा प्रकार उलगडतो. घाटाबाहेर पडण्याचे रस्ते मिळतात. घाट कितीही भावला तरी तिकडे मुक्काम करावयाचा नसतो. 

Comments

Popular posts from this blog

मेकिंग मोमेंट्स मॅजिकल

Perfectly imperfect?

दृष्टिकोन