मानस

कोणताही माणूस नास्तिक नसतो. निसर्ग, वैश्विक शक्ती, ऊर्जा, स्वतः कशावर तरी त्याची श्रद्धा असते, विश्वास असतो. या विश्वासाच्या बळावरच तो त्याचा परिपूर्णतेकडचा मार्ग आक्रमित असतो. 



बघितलंयस फुलपाखरू
कसं फुलावर डोलतं 
माझं मनही असंच नेहमी
तुझ्या विचारात सुखावतं 
 
 
काट्यातून, हिरवळीतून,
मखमलीतूनही परतून 
तुझ्याच कुशीत हळुवार
शांतपणे विसावतं
 
 
मनाचा विरंगुळा तू 
तू प्रसन्नतेचे आगर 
शांतीचा ठेवा तू 
तू स्वप्नांचा सागर 
 
 
तूच इच्छाशक्तीचा स्रोत 
तू आशेची लावलवणारी ज्योत 
मनाच्या मिटणाऱ्या पाकळ्या फुलविणारा 
तूच वाऱ्याचा सुंदर झोत 
 
 
उंचावून स्वतःला क्षितिज विस्तारणंही 
तुझंच अस्तित्व शिकवितं 
माझं मनही असंच नेहमी 
तुझ्या विचारात सुखावतं 
 
 
पौर्णिमा ढेरे 

Comments