भाषा
Image Credit : Google Images
माणसाच्या उत्क्रांतीमधला महत्वपूर्ण घटक संवाद व ओघानेच भाषेची निर्मिती समजला जातो. एकमेकांशी वैचारिक देवाणघेवाण करण्याची क्षमता असल्यानेच मनुष्यप्राणी इतर प्राण्यांपासून वेगळा व उजवा ठरतो.
भाषेची उत्पत्ती होण्याआधी मानवाने सांकेतिक भाषा, खाणाखुणांचा वापर केला असेल. सध्या आपण मूकाभिनयाने गोष्टी ओळखण्याचा खेळ खेळतो तेव्व्हा साध्या सोप्या भावना पोहोचवताना उडणारी तारांबळ करमणुकीचा भाग ठरते. प्रत्यक्षात भाषा नसताना सांकेतिक भाषेच्या मर्यादा माणसांना हाताशही करत असतील.
कालापरत्वे नवनवीन शब्द त्यांचे अर्थ यांची निर्मिती, सांगड घालण्याची क्रिया वेगळाच आनंद मिळवून देत असेल किव्वा त्यातून कदाचित वादही निर्माण होत असतील.
आज आपण जगभरात अनेक प्रगत भाषा वापरतो. विविध भाषांवर प्रभुत्व असणारे अनेक लेखक, कवी इत्यादींनी भाषांना वेगवेगळे अलंकार देऊन सजविले, नटविले, घडविले. दोन माणसातला संवाद समाजाभिमुख झाला. भाषेची व माणसांची पोहोच वाढली. आपल्यातल्या अवलियांनी यंत्रांनाही समजणाऱ्या भाषा बनविल्या.
पण भाषा हे साधन आहे. त्यामुळे इतर साधनांप्रमाणेच त्याचा वापर व्यक्तिनिष्ठ आहे. भाषेचे सौंदर्य हे वापरणाऱ्या व्यक्तीच्या मानसिक सौंदर्यावर अवलंबून आहे. तिची पारदर्शकताही व्यक्तीच्या मनाच्या पारदर्शकतेवर अवलंबून आहे. भाषेचा अर्थ, व्यापकता, खोली सर्व माणूसच तिला प्रदान करतो.
म्हणूनच कित्येकदा संभाषण व संवाद आपल्याला गूढ वाटतात. काही अगम्य, काही अलौकिक तर काही अर्थशून्य होऊन जातात. शब्दांच्या निरर्थक रंगपंचमीनंतर माणूस निशब्द होऊन जातो. तर कधी परिस्थिती शब्दांपलीकडची असते. म्हणूनच तर कोणीतरी हे लिहून ठेवलंय
शब्द जीवनाची अपत्ये
मृत्यूपर्यंत पोहोचू शकत नाहीत
म्हणून तुझ्या समाधीवर
वाहतोय मी माझे मौन!
कधीकधी इतकी वैचारिक एकरूपता येऊन जाते कि माणसाला भाषेची, शब्दांची गरजच पडत नाही आणि म्हणून माणूस निशब्द होतो.
थोडक्यात व्यक्तींमधील दुवा साधण्यापर्यंत किव्वा निखळण्यापर्यंत या भाषा व शब्दांचे विश्व अस्तित्वात असते. त्यापलीकडे पोकळी असते .... रिक्ततेची किव्वा परिपूर्णतेची!

Excellent
ReplyDeleteThank you!
Delete