नातेसंबंध



 मनाचे आणि व्यावहारिक विश्वच वेगळे असल्याने कधी कधी जगरहाटी स्वीकारून रुजताना काही मूलभूत संज्ञांबाबत प्रश्नचिन्ह उभे राहते. या संज्ञांची उत्पत्ती आणि उत्क्रांतीवर प्रकाशझोत पडला  तर त्या आहे तशा आजमाविण्याचे बळ  निर्माण होते.




नाते जुळले मनाशी मनाचे ......

संध्याकाळच्या मंद झुळकेवर तरळणारे रेडिओवरील स्वर कानी पडले आणि मनाने त्यावर हलकेच डुलायला सुरुवात केली.   समाजशील माणसाने  आपल्या जीवनरूपी कोषात गुंफलेल्या या अनोख्या धाग्याची जाणीव नव्यानेच झाली.

 माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. आपल्या भोवताली नात्यांचे बंध गोफत आपले जग निर्माण करीत असतो. या गोतावळ्यात कितीतरी रंगांचे अन नाना ढंगांचे असंख्य धागे विणलेले असतात. हेच ते नातेसंबंध!

काही निसर्गदत्त देणगी जशी रक्ताची नाती तर काही आपणहून जोडलेले बंध जशी व्यावहारिक किंवा व्यावसायिक नाती. काही बंध सहजच जुळतात पण नैसर्गिक बंधांपेक्षाही दृढ होऊन बसतात. काही रुतणाऱ्या खुपणाऱ्या  बंधांची जाणीव नाहीशी करून टाकतात. आपल्या मनाचा बांध फोडून आपल्या जीवनाशी एकरूप होऊन जातात. तेंव्हाच तर असे गाणे स्फुरते आणि मनाशी मनाच्या जुळणाऱ्या नवीन नात्याचा साक्षात्कार होतो.

पण हे बंध जोवर 'बंध' आहेत तोवरच ते एकत्र ठेवण्याचे काम करतात. त्यात एकदा का 'सं'  जोडला कि जो 'संबंध' निर्माण होतो तो माझ्यामते त्या बंधांची ताकद कमी करून टाकतो. कारण संबंध म्हणजे  देवाण घेवाण! व्यवहार! अन मग  ओघानेच येणारा  हिशोबही! त्यात मनातून मनाने मनासाठी मनभरून केलेल्या गोष्टींचा समावेश होत नाही.

त्यामुळे नातेसंबंधातून 'सं ' बाजूला काढून शेष उरणाऱ्या नात्यांचे रेशमी बंधच गुंफण्याचा  माणसाने प्रयत्न करावा व आपल्या मनासारखे तरल भावबंध सभोवताली निर्माण करावे

Comments