स्थित्यंतर
पहिलं प्रेम ! सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय ! कारण सहसा तेच निखळ स्वरूपात अस्तित्वात असतं ! परिस्थिती, काळ, मनाच्या अवस्थांची भेसळ निदान याला प्रदूषित करत नाही. आपलं व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व बदलून सकारात्मक मानसिकता रुजवणे, जगण्याची नवी उमेद निर्माण करणं, आयुष्याला एक ध्येय, दिशा व वेग देणं आणि सर्वांविषयी सहृदयता जागृत करणं अशी किमया दाखविणारा हा जादूगार, कोणी स्वीकारो अथवा नाकारो प्रत्येक मनाच्या सांदीकोपऱ्यात ठाण मांडून बसलेला असतो. कित्येकदा जगण्याच्या धडपडीचा मूलभूत पाया असतो!
एक फुलपाखरू बसलं
अन कोमेजलेल्या कळीला
एकदातरी उमलावंसं वाटलं
घट्ट मिटलेल्या पाकळ्या
अलगद उलगडल्या तीने
छोट्या गोड फुलपाखराशी
मैत्रीही केली तीने
हळू हळू फुलपाखराने
कळीचं रूपच पालटविलं
रंग हरवून बसलेल्या पाकळ्यांना
नव्या रंगात रंगविलं
वेलीवर एकाएकी
नवचैतन्य तरारलं
अन वेडं फूल
त्या नव्या जगात हरवलं
कोषातील जगाचा
दरवाजा तोडून
वाऱ्याच्या झुळकेवर
कितीवेळ डोललं
छोटं गोड फुलपाखरु
थोड्यावेळ घुटमळलं
पण हरखून गेलेल्या फुलाचं
त्याकडे लक्षच नाही गेलं
वेलीवरची गर्दी
फुलतंच गेली
पण प्रत्येक क्षणात फुलाला
उणीव भासत राहिली
दूरवरच्या झाडावर
फुलपाखरू हळूच बसलं
समोरची लगबग
शांत न्याहाळू लागलं
एकत्र घालवलेले
अन मंतरलेले दिवस
आठव संपूच नयेत अशी
डोळ्यात तरळणारी आस
दोन्ही जीवांची ही स्थिती
होती आधीही आणि नंतरही
त्या आस आभासातच
संपणार का हे आयुष्यही
कळीचा स्थित्यंतर
तुला प्रश्न करतंय
फुलपाखरा तुला
नक्कीच उत्तर द्यायचंय
नादावणाऱ्या तुझ्या अल्लडपणात
कसं विसरू मी स्वतःला
कसं बाहेर काढू
माझ्यातील बाल्ल्याला
शिकवलं आहेस तू मला
नव्याने जगायला
मनातलं बोलायला
अन खळखळून हसायला
स्वप्नातच बागडायला अन
आकाशात तरंगायला
आपणच आपल्याला
नीटपणे ओळखायला
अन स्वतःचेच क्षितीज
हळूहळू रुंदावायला
पण जर तूच नसशील
तर हे सगळंच व्यर्थ आहे
नदीनं झऱ्याचं
घेतलेलं सोंग आहे
जगण्याला माझ्या
अर्थ निर्माण करून देशील?
की तूही इतरांसारखे
अर्ध्या वाटेवरच सोडशील?
पौर्णिमा ढेरे

Comments
Post a Comment