आषाढ पाऊस
पाऊस हा एक शब्द उच्चारल्यावर तुमच्या मनात नक्की कोणते संदर्भ दाटून येतात? सध्या मला पाऊस सुरू झाला की पावसाळी कविता, काव्य मैफिली, त्यातही श्रावणी काव्य स्पर्धा आणि त्यावर कडी म्हणजे आषाढ कवितांची आमंत्रणे डोळ्यासमोर आली. श्रावणी कवींवर टीका-टिप्पणी करणाऱ्या पोस्ट, त्यांच्यावरच्या कोट्या फिरवणारे संदेश या विचारांमुळे लहानपणीचे नव्या पुस्तक- वह्यांचा वास, रेनकोट घालून डबक्यात उड्या मारणारी मुले,भजी आणि कॉफीसाठी आर्जवे करणारे नवरे, पहिल्या पावसाबरोबर गौरी गणपती आणि सणवार सवाष्णींची चिंता करणाऱ्या सासवा, विरहमग्न दाम्पत्ये, मातीचा सुवास हे सगळे संदर्भ पार पुसून गेले. पाश्चात्त्य कालमापन आणि संस्कृती स्वागतपूर्ण अंगिकारल्याने सध्या महिने,ऋतू यांचे संदर्भ अडगळीत गेले आहेत. आषाढ कविता! आता आषाढ म्हणजे कुठला इंग्रजी महिना? परत पावसाळ्यात याचा कुठला नंबर? नक्की पावसाळी ऋतू कुठले? हा पहिला तळागाळात गेलेला संदर्भ या विषयाने मला आठवून दिला. श्रावणी पाऊस शाळेपासूनच मनात बिंबलेला होता. बालकवींच्या 'श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात ...